हरभरा लागवड सुधारित पद्धत
कोरडवाहू क्षेत्रामध्ये हरभरा हे रबी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिक.
हरभरा भरघोस उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या बाबी :-
- सुधारित वाणांची निवड
- योग्य जमिनीची निवड
- पूर्वमशागत
- पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर
- बिजप्रक्रिया
- तणनियंत्रण
- पाण्याचे नियोजन
- रोग आणि किडींपासून पिकाचे संरक्षण
जमीन :-
पिकासाठी मध्यम ते काळी कसदार व चांगल्या निच-याची जमीन निवडावी, हलक्या अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभ-यासाठी निवडू नये. जमिनीचा सामू ५.५ ते ८.६ असावा.
पूर्वमशागत :-
खरीपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमीनीमध्ये मिसळावे. या प्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
हरभरा सुधारित वाण :-
अ.क्र. |
हरभरा वाण |
कालावधी |
उत्पादन |
प्रमुश वैशिष्ट्ये |
1 |
बीडीएन-93 |
110-105 |
10-11 (जिरायत) 18-20 (बागायती) |
लवकर तयार होणारा, पाण्याचा ताण सहन करणारा, मर रोग प्रतिकारक, दाणा लहान. |
2 |
बीडीएनजी-797 (आकाश) |
105-110 |
18-24 (कोरडवाहू) |
पिवळसर टपोरे दाणे, कोरडवाहूसाठी उत्तम |
3 |
फुले जी-12 |
105-110 |
10-12 (जिरायत) 20-25 (बागायती) |
मर रोग प्रतिकारक, दाणे मध्यम आकर्षक पिवळे |
4 |
फुले जी-5 (विश्वास) |
105-110 |
25-30 (बागायती) |
घाटे लांब मोठे, हिरवा हरभरा म्हणून चांगला |
5 |
विजय |
110-115 |
15-18 (जिरायत) |
पाण्याचा ताण सहन करणारा, मर राग प्रतिकारक, जिरायती व बागायतीसाठी योग्य, उशिरा पेरणीसाठी शिफारस |
6 |
विशाल |
110-115 |
15-20 |
दाणे टपोरे, बागायती व कोरडवाहूसाठी योग्य |
7 |
दिग्विजय |
105-110 |
14-15 (जिरायत) 30-35 (बागायती) |
दाणे मध्यम आकारचे बागायती व कोरडवाहूसाठी योग्य |
पेरणी कालावधी :-
हरभरा हे रबी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये २५ सप्टेंबरनंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय हा वाण वापरावा. बागायती हरभरा २० ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते.
पेरणीची पद्धत :-
सामान्यत: देशी हरभ-याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करावी. पेरणी अंतर ३० X १० सेमी ठेवावे.
लहान दाण्याच्या वाणाकरीता (उदा. फुले जी.-१२)–६० ते ६५ किलो/हे.
मध्यम दाण्याच्या वाणाकरिता (विजय)–६५ ते ७० किलो/हे.
टपो-या दाण्याच्या वाणाकरिता (विश्वास, दिग्विजय, विराट) – १०० किलो/हे.
हरभरा सरी वरब्यावंरही चांगला येतो. भारी जमिनीत ९० सेंमी रुदींच्या स-या सोडाव्यात आणि वरब्यांच्या दोन्ही बाजूला १० सेमी अंतरावर १ ते २ दाणे टोकावे.
बीजप्रक्रिया :–
पेरणीपुर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम बावीस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि २५ ग्रॅम रायझोबियम आणि पी.एस.बी गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून बिज प्रक्रिया करावी.
खत नियोजन :-
हरभ-याला हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरदाची आवश्यकता असते. घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २ टक्के युरीयाची फवारणी करावी.
आंतरमशागत :–
पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तण विरहीत ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी. उगवणीपूर्वी तणनाशकाचा वापर करायचा असल्यास पेंडिमिथीलीन ५ लीटर (स्टॉम्प ३० इ.सी) किंवा अँलाक्लोर (लासो ५० इ.सी) ३ लीटर एक हेक्टर क्षेत्राकरिता ५०० लीटर पाण्यामध्ये मिसळून अंकूर येण्याआधी फवारावे.
पाणी व्यवस्थापन ( पाणी नियोजन):-
हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे पीक आहे. हरभरा पिकाला साधारणपणे २५ सेमी पाणी लागते. पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण चांगली होते. मध्यम जमिनीमध्ये सुमारे २५ ते ३० दिवसांनी द्यावे. ४५ ते ५० दिवसांनी दुसरे पाणी आणि आवश्यकता वाटल्यास तिसरे पाणी ६५-७० दिवसांनी द्यावे. जमिनीच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
किड व्यवस्थापन :-
हरभरा पिकाचे घाटेअळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. पीक ३ आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात. याबेळी लिंबोळीच्या ५ टक्के द्रावणाची एक फवारणी घ्यावी. त्यामुळे अळीची भूक मंदावते. आणि त्या मरतात. पुढे १० ते १५ दिवसांनी हेलिओकिल ५०० मिली प्रति हेक्टर या विषाणूजन्य किटकनाशकाची फवारणी करावी. या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्रॅम ज्वारी, १०० ग्रॅम मोहरी आणि २ किलो धने शेतामध्ये पेरावे. या पिकांच्या मित्रकिडीच्या आकर्षणासाठी उपयोग होतो त्यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होते. पक्षांना बसायला जागोजागी तु-याटयाची मचाणे लावावीत. त्यावर कोळसा, चिमण्या, सांळुक्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात. हेक्टरी ५ फेरोमेनचे सापळे लावावेत
.
काढणी :–
१०० ते ११० दिवसांमध्ये पीक चांगले तयार होते. पीक ओलसर असताना काढणी करु नये. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभ-याची काढणी करुन मळणी करावी. यानंतर धान्यास ५-६ दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला (५ टक्के) घालावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.
0 टिप्पण्या
if you hav doubt le know